
पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता
पुणे/दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तामिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर लगेचच मोठी संघटनात्मक जबाबदारी मोहोळ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.
पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर युवा मोर्चा, शिक्षण मंडळ, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापौर, प्रदेश महामंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजपा सहप्रमुख असा संघटनात्मक प्रवास केला आहे. सलग तीस वर्ष संघटनेसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल पक्षाकडून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय निवडीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाचा मोहोळ यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नवी जबाबदारीही या भूमिकेतून निभावणार आहे.
‘माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. नव्या जबाबदारीच्या रूपाने पार्टीने दाखवलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल. नव्या जबाबदारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वात नवी जबाबदारी पार पाडेल, हा विश्वास व्यक्त करतो’, असेही मोहोळ म्हणाले.