चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ; भारतानं इतिहास रचला : चंद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग

भारतीयच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या
चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरला आणि भारताने जगाच्या चंद्र मोहिमेत विक्रम प्रस्थापित केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक क्षणाची प्रतिक्षा चंद्रयान ३ मोहिमेला सुरुवात झाल्यापासून सर्वांना होती आणि ती प्रतिक्षा आनंदी वातावरणात संपली. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी उतरला आणि टाळ्यांच्या कडकडाट झाला यावेळी शास्त्रज्ञांनी चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दैदिप्यमान यश संपादन केल्याने जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून हा क्षण अनुभवण्यासाठी जोडले गेले होते. मोहीम यशस्वी होताच मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या यशानंतर इस्रो अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मोदी यांना नमस्कार केला व सांगितलं की, “चंद्रावर आपण सॉफ्ट लँडिंग केलं आहे. भारत चंद्रावर पोहोचला आहे. या कामगिरीसाठी तुमचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा आम्हाला द्या.” यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ आणि देशातील तमाम जनतेचं अभिनंदन केलं.
मोदी म्हणाले, हा क्षण भारतासाठी अभिमानास्पद आणि जयघोषाचा आहे, आणि त्यामुळे भारतीय जल्लोषात मग्न आहेत. त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक केलं आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. मागची चंद्र मोहीम अयशस्वी झाली होती त्यामुळे अपयशातून यश कसे मिळवायचे हे आपण दाखवून दिले आहे असेही ते म्हणाले.
हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण शंखनादाच आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा क्षण आहे. आपण हे ऐतिहासिक क्षण अनुभवतो, तेव्हा अभिमान वाटतो. ही नव्या भारताची पहाट आहे. आपण जमिनीवर संकल्प केला आणि चंद्रावर स्वप्न साकार केलं. भारत आता चंद्रावर पोहोचला आहे” असे मोदी म्हणाले.
१४ जुलैला आकाशात झेप घेतल्यानंतर ४० दिवसाच्या प्रवासात सर्व भारतीयांचे लक्ष या मोहिमेकडे होते. आज सर्व भारतीयांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. हा क्षण पाहण्यासाठी सर्वजण अतुर होते. देशातील प्रत्येक भागासह पुण्यातही फटाके फोडून, ढोल वाजवत आनंद साजरा करण्यात आला. पेढे, साखर वाटून जल्लोष येत आहे.







