चंद्रकांतदादा पाटील- समाजासाठी समर्पित कार्यकर्ता

रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना एक पद्य नेहमीच तोंडपाठ असते. ते पद्य म्हणजे ‘विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावेI परिसरातल्या अणुरेणूतुन अविरत वेचुनी तेजाचे कण, रसगंधाशी समरस होऊनि हृदयकमल फुलवावे ।।” ह्याचा अर्थ आपल्याला स्वतःला विकसित (progress) करायला हवे आणि मग ते ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव इतरांना समर्पित (dedicated) करायला हवे. तसेच आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून, म्हणजे अणू-अणू आणि तेजातून, सतत ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवून, आपल्या इंद्रियांच्या (रस, गंध, इत्यादी) माध्यमातून एक सुंदर आणि समृद्ध भावना निर्माण करणे, ज्यामुळे आपले हृदय किंवा मन फुलून जाते, म्हणजेच आनंदित आणि उत्साही होते. संघाच्या याच शिकवणीतून अनेक स्वयंसेवक घडले, ज्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी स्वतःला वाहून घेतले. याच श्लृंखलेतील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील!

चंद्रकांतदादा म्हणजे एकप्रकारे समाज आणि संघटनेसाठी समर्पित व्यक्तीमत्व! गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांना संघटनेच्या शिर्षस्थ नेतृत्वाने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सांगितल्यावर , त्यांनी संघटनेची इच्छा ही आज्ञा मानून कोथरुड मधून निवडणूक लढली, आणि विजयी झाल्यापासून आजपर्यंत कोथरुडकरांसाठी स्वत:ला समर्पित केले.



गेल्या पाच वर्षांत कोथरुड मध्ये इतके सेवा उपक्रम राबविले की, पाच वर्षानंतर झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी ज्या चंद्रकांतदादा पाटील यांना घरचा नव्हे, बाहेरचा म्हणून विरोधकांकडून हिणवले जायचे. त्याच दादांबद्दल बोलणाऱ्यांना कोथरूडकरांनी चांगलीच चपराक लगावली. त्यामुळे काही दांडकेबहद्दरांची दातखिळ बसली. असो….



वास्तविक, दादा केवळ कोथरूडच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एवढे समर्पित आहेत. त्यांनी कोथरुड मध्ये जे सेवा प्रकल्प राबविले, ते खरंतर हिमनगाचे एक टोक म्हणावे लागेल. कारण, केवळ कोथरूडच नव्हे, तर कोल्हापूर, सोलापूर, जळगांव, मुंबई अशा विविध शहरांमध्ये राबविले आहेत. याशिवाय, अनेक संस्था आणि संघटनांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. ज्यामुळे आज या संस्था समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहेत.



आज त्यांनी समाजाला इतकं वाहून घेतलंय की, ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ हा त्यांचा जीवनमंत्र झालाय. आणि हाच मंत्र घेऊन ते समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी झटत आहेत. त्यांचे हे झटणे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण समाजाला वाहून घेतलेल्या व्यक्तींना तहान-भूक कशाचीही तमा नसते. ते केवळ, समाज आणि देश याचाच विचार करतात. त्यांनी सुरु केलेल्या ‘सुखदा’ ‘मानसी,’ ‘झाल’ सारख्या उपक्रमांमुळे कोथरुड मधील आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिलांना हक्काचा भाऊ मिळाला आहे. तर ‘निसर्गछाया’ आणि संजीवन केअर सेंटर मुळे ज्येष्ठांना एक आधार मिळाला आहे. ह्याशिवाय सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे माहेरघर असलेल्या कोथरुडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. या सर्वांमुळे संघाची विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे हा त्यांचा गुण सर्वांनाच आपलेसं करत आहे. आज वयाच्या ६६ वर्षांत पदार्पण करताना त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
जीवेत शरद: शतम्II



























