पुणे शहर

महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार- शहराध्यक्ष रमेश बागवे

पुणे : महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची काँग्रेसची योजना आहे. मॅरेथॉन, नॅशनल गेम, कॉमनवेल, क्रीडानगरी म्हणून पुणे शहराला नावलौकिक मिळवून दिला, त्यातून शहराच्याच नव्हे, तर देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मागिल काही वर्षांत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कमी पडलो, मात्र आता ती चूक होणार नाही. भाजपने खोटा प्रचार करून कुटील नीती वापरून फोडाफोडीचे राजकारण केले. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नेतेमंडळी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, माजी आमदार आता पुन्हा जोमाने कार्यकर्ते कामाला लागले. काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता, त्याची आर्थिक परिस्थिती कमी असली तरी, त्याने लोकांना विश्वास मिळविला आहे, त्याला ताकद देऊन त्याची निवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून केली जाणार आहे, असे माजी गृहराज्यमंत्री आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी विचारांची देवाण-घेवाण चर्चासत्रामध्ये काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री व शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे महानगरपालिका गटनेते आबा बागुल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना आमंत्रित केले होते. यावेळी महापालिका निवडणुका आणि काँग्रेसची रणनीती या विषयावर साधण्यात आला.

Img 20210724 wa0001

बागवे म्हणाले की, पालिकेमध्ये ज्या ठेकेदार काळ्या यादीमध्ये आहे, त्यालाच पुन्हा काम दिले जात आहे. मागिल पाच वर्षांमध्ये ५८ प्रपोजलमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे, ते नागरिकांना पुराव्यानिशी दाखवून देणार आहोत. पुण्याचा विकास कोणी केला आणि भ्रष्टाचार कोणी केला ही बाब नागरिकांपुढे मांडणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अभय छाजेड म्हणाले की, शहरातील रस्ते रुंदीकरण्याचे काम काँग्रेसने केले. पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याची योजना राबविली. नदीसुधार योजना मोठ्या प्रमाणात राबविली. शहरवासियांना सुविधा देण्यासाठी बीआरटी आणली, त्यावेळी याच सत्ताधाऱ्यांनी विरोध केला होता. मेट्रोचे नियोजनही काँग्रेसनेच केले, त्याचे श्रेय सत्ताधारी घेऊ पाहत आहे, हे दुर्दैव आहे, काँग्रेस विचारांचा पक्ष आहे, काँग्रेसच्या विचारधारा असणाऱ्या कार्यकर्त्याला येत्या निवडणुकीमध्ये प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आबा बागुल म्हणाले की, काँग्रेसला प्रचंड मोठे नेतृत्व आहे. मात्र, काँग्रेस आपसातच वाद घालत आहेत. स्थानिक पातळीवर किंवा वरिष्ठांकडून आदेश येतात, त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होते, त्यामुळे मंडळी दुखावली जातात. कार्यकर्त्यांची निवड करताना काही निकष लावण्याची गरज आहे. काँग्रेस सामान्यांना न्याय देणारा आणि पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच सत्तेवर येईल. महापालिकेमध्ये गावे समाविष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय बालगुडे म्हणाले की, भाजपला जनाधार नव्हता, शिवसेनेमुळे भाजप वाढला. स्मार्ट सिटीविरोधात मी कोर्टात न्याय मागितला आहे. १४ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली, त्यातील एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. नदी सुधार योजनेसाठी ९२७ कोटी आणले. त्याचे जगभर होर्डिंग्ज लावले, प्रत्यक्षात काही कामे झाली नाहीत, असा त्यांनी आरोप केला.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, विद्येच्या माहेरघरामध्ये पुणे शहरातील मान्यवरांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी ही कट्टा संस्कृती आहे. आज शहरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्टावर आमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये