महापालिकेमार्फत ३० वर्षांवरील प्रत्येकाची मधुमेह, उच्च रक्तदाबाची तपासणी

मुंबई : महानगरपालिकेच्या असंसर्गजन्य विभागामार्फत मुंबईत आता ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची चाचणी करण्यात येणार आहे.
करोना साथीच्या काळात मधुमेह, उच्च रक्तदाब या असंसर्गजन्य आजारांचा धोका आणि वेळेत निदानाचे महत्त्व अधोरेखित झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे निदान आणि उपचारावर भर देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने या दोन्ही आजारांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे.
सर्व चाचण्या मोफत
घरोघरी सर्वेक्षण करून ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची चाचणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत आढळणाऱ्या संशयीत रुग्णांना पुढील तपासणी आणि खात्री करण्यासाठी जवळील आरोग्य केंद्रामध्ये पाठविले येणार आहे. तेथे या रुग्णांचा पाठपुरावा करून आवश्यक ते उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालयांमध्ये इतर तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणीची मोहीम मुबंई महानगरपालिकेने राबविली होती. परंतु त्यात ३० वर्षांवरील नागरिकांचा समावेश नव्हता. या मोहिमेमध्ये मुंबईतील ३० वर्षांवरील सुमारे ३० लाख नागरिकांच्या दोन्ही तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच घरोघरी सर्वेक्षण करताना या आजारांबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या असंसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.
संशयित रुग्ण, पाठपुरावा केलेले रुग्ण, उपचार ही सर्व माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने उपलब्ध केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे ही सर्व माहिती डिजिटल स्वरुपातही जतन करण्यात येणार आहे.




