आपल्या सांस्कृतिक जीवनाला कोरोनाची लागण ; डॉ. न.म.जोशी

डॉ. रावसाहेब कसबे आणि दिलीप प्रभावळकर यांना ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार प्रदान..
पुणेः- सध्याचे आपले सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवन ढवळून निघाले आहे. आपले समाजजीवन अनेक प्रश्नांनी व्यापले आहे. काही प्रश्न बाहेरील देशातून आलेल्या कोरोनासारखे आहेत, तर काही अंतर्गत देखील आहेत. आज तर आपल्या सांस्कृतिक जीवनालाच कोरोनाची लागण झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म.जोशी यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित 21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात आज ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म.जोशी यांच्या हस्ते ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखक साहित्यिक डॉ.रावसाहेब कसबे यांना साहित्य क्षेत्रासाठी तर प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रूपये अकरा हजार आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.
यावेळी व्यासपीठावर गरवारे उद्योग समुहाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीधर राजपाठक, गरवारे उद्योग समुहाचे अधिकारी मकरंद पाचडे, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि 21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.न.म. जोशी म्हणाले की, देशातून कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी लसींचा वापर केला जात आहे, तसेच सांस्कृतिक जीवनाला झालेली कोरोनाची लागण दूर करण्यासाठी डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासारख्या विचारवंतांचे विचार आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या अभिनेत्याची कला यांचा उपयोग करण्याची गरज आहे. त्यांचे विचार आणि कला याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात तर आनंददायी शिक्षण हा विचार अधिक खोलवर रूजणे ही भावी पिढीसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.
सध्याचे सर्व वातावरण हे राजकारणोन्मुख झाले आहे. सगळ्या गोष्टी राजकारणाशी जोडल्या जातात. जातीशी जोडल्या जातात. या संपूर्ण पार्श्वभूमीवर माझा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षणावर कोणीही वादविवाद करू नये. कारण समाजातील शेवटच्या वंचितापर्यंत घास गेलाच पाहिजे आणि ही संपू्र्ण समाजाची जबाबदारी आहे.



यावेळी बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, अनेक देशांमध्ये ज्या क्रांती झाल्या, त्यामागे साहित्यिक आणि कलावंत होते. आज आपल्या देशाचे समाजकारण आणि समाजाची एकात्मता टिकवून साहित्यिक आणि कलावंतांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशाचे सुशासन आणि समाजाची एकात्मता टिकविण्यासाठी साहित्यिक आणि कलावंत पुढे आले, तर भारतीय राजकारणी देखील सुसंस्कृत बनू शकतात, हे आपण दाखवून देवू शकतो.
यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी मनोगत व्यक्त केले. गरवारे उद्योग समुहाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीधर राजपाठक यांनी ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार’ प्रायोजित करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि 21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांनी केले. उपाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.