पुणे शहर

येरवड्यात कारवाईनंतर देखील अतिक्रमणे शाबूत; कारवाईचा केवळ फार्स?

पुणे : प्रभाग दोन मध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मागील अनेक दिवसांपासून तक्रारी केल्यानंतर एक जुलै रोजी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. येथील आरटीओ फुलेनगर, आळंदी रोड तसेच इतर ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई करून देखील मूळ अतिक्रमणे शाबूत असल्यामुळे या कारवाईबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून अतिक्रमणांना अभय देणाऱ्या जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष निखिल गायकवाड यांनी केली आहे.

Fb img 17803875442192531368419001118856

शहरात अतिक्रमण विभागाच्या वतीने सातत्याने ठिकठिकाणी अतिक्रमण कारवाया सुरू आहेत. मात्र या भागातील वाढत्या अतिक्रमणांबाबत वेळोवेळी तक्रारी करून देखील कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नऊ जुलै रोजी आळंदी रस्त्यावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाणार आहे. यानिमित्ताने पोलिस आयुक्तांनी नुकतीच महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह पालखी मार्गाची पाहणी केली. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच पालखी मार्गांवरील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या होत्या.

येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे पदपथावरून चालण्यासाठी देखील नागरिकांना जागा नाही. आरटीओ फुलेनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने यामुळे ज्येष्ठ नागरिक शाळकरी विद्यार्थी यांना रस्त्यावरून चालण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अनेक लहान मोठे अपघात सातत्याने घडत असतात. या गंभीर समस्येबाबत वेळोवेळी तक्रारी करून देखील महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली नव्हती. 1 जुलै रोजी तात्पुरत्या केलेल्या दिखाऊ कारवाईत काही अनधिकृत पथारी व्यावसायिक व टपऱ्या यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र खरी भक्कम अशी अतिक्रमणे जागेवरच असून त्यांना कोणाच्या आशीर्वादाने सवलत देण्यात येते असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गंभीर बाब म्हणजे अतिक्रमण विभागाचे अधिकारी महापालिकेची हद्द सोडून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदपथावरील टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. प्रभाग दोन मधील अधिकृत पथारी व्यावसायिक यांची यादी जाहीर करून अनधिकृत टपऱ्या व व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, परिमंडळ येथे उपायुक्त व नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त यांना तक्रार केल्यानंतर पुढील काळात बेकायदेशीर अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने कारवाई होईल का नाही हे आगामी काळातच पहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये