माजी नगरसेवक सचिन दोडके,विकास दांगट,बाळासाहेब धनकवडे,सायली वांजळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकांत पाटील माजी सभागृहनेते गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले,धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे,वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे,त्यानंतर माजी नगरसेवक आणि २ वेळा विधानसभा लढविलेले सचिन दोडके,माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे,सायली वांजळे,विकास दांगट यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडून शरद पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेतली आणि विजय मिळवला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती, असे बोलले जाते. आता फडणवीसांच्याच सूचनेनुसार सुरेंद्र पठारे घरवापसी करत असल्याने पठारे कुटुंबाने एकाच वेळी दोन्ही प्रमुख पक्षांशी ‘नाळ’ जुळवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे. सुरेंद्र यांच्यासोबतच पुण्यातील माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. आजच्या प्रवेश सोहळ्यात अजित पवार गटाचे तब्बल 8 आणि इतर पक्षांचे 7 अशा 15 बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ आणि माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही भाजपची वाट धरल्याने महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.



