हापूस सामान्यांच्या आवाक्यात; जाणून घ्या दर

पुणे : अक्षयतृतीयेनंतर आंब्यांची आवक वाढली असल्याने आता हापूस सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याचे दर प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दरम्यान आहेत. गेल्या आठवडयात एक डझन आंब्याचे दर ९०० ते १२०० रुपये होते.
हवामान बदलाचा विपरीत परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडयात बाजारात हापूसची आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात ती नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर जास्त होते. आवक नसल्याने आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात नव्हते.
अक्षयतृतीयेदरम्यान आंब्याची आवक वाढली. गेल्या आठवडयात १ ते ३ मेदरम्यान पुण्यातील मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून एकूण मिळून २५ ते ३० हजार पेटया हापूसची आवक झाली. आंब्यांची आवक वाढल्याने आता दरात मोठी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याचे दर प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दरम्यान आहेत. हापूसच्या पेटीमागे एक हजार ते १२०० रुपयांनी घट झाल्याचे सांगितले जात आहे.

