विधवा झाल्यावरही महिला घालणार मंगळसूत्र ; या गावाने घेतला क्रांतिकारी निर्णय

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त हेरवाड या गावाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीनं ठरावाद्वारे विधवा प्रथा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे हातातील बांगडया फोडल्या जातात. पायातील जोडवी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, अशी परिस्थिती आजही आहे. कायदयाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायदयाचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करीता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात जनजागृती करण्यात यावी. त्यास ही सभा मंजूरी देत आहे, असा ठराव ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव 4 मे 2022 रोजी करण्यात आला आहे. हेरवाड ग्रामपंचायातीचे सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरावावर सूचक म्हणून मुक्ताबाई रूज पुजारी तर अनुमोदक म्हणून सुजाता केशव गुरव यांची नावे आहेत.
महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांची ही मूळ संकल्पना आहे. त्यांच्या या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन विधवा प्रथा बंदचा ठराव केल्याचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले. तर प्रमोद झिंजाडे म्हणाले, ‘सती प्रथा बंद झाली तसं विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा व्हायला पाहिजे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्तीसाठी कोणी प्रयत्न केला नाही. म्हणून या अनिष्ट प्रथेला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे.’
महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. हेरवाड या गावाने महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त करते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या ‘विधवा प्रथा बंद’ या निर्णयाचं मी स्वागत करते, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
राज्याचे माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी देखील ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.




