कोथरूड मतदार संघातील प्रभागांमध्ये कसा असणार महापालिका निवडणूक निकालांचा कल..उत्सुकता शिगेला..

कोथरूड : पुणे महानगरपालिके साठी आज आज झालेल्या मतदान प्रक्रियेत राजकीय पक्षांचे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. उद्या या मतदानाची मतमोजणी पार पडणार असून दुपारपर्यंत कोणते नवे चेहरे महापालिकेत प्रवेश करणार तर कोणते जुने माजी नगरसेवक पुन्हा महानगरपालिकेत आपली राजकीय कारकीर्द घडवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अनेक जागांवर अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता असल्याने उद्याच्या निकालाकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
गेले पंधरा दिवस विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांच्या सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या.. या पंधरा दिवसात बरीच राजकीय चिखलफेक पुणेकरांनी अनुभवली. एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सर्वांनी पाहिल्या. या आरोपांमध्ये किती तथ्य होते..यावर चर्चा रंगताना पाहिल्या मिळाल्या. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत या निवडणुकीत पाहिला मिळाली. पुणेकरांनी आता कोणाच्या पारड्यात कौल दिलाय हे आता उद्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे होम पीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरूड मतदार संघात असणाऱ्या सहा प्रभागांमध्ये काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. पुणे शहरा सोबतच या मतदार संघातील निवडणूक या दोघांसाठी जास्त महत्वाची मानली जात आहे.
या मतदार संघात येणाऱ्या बाणेर बालेवाडी पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक गेली पंधरा दिवसांत चांगलीच गाजली. भाजपने तिकीट कापल्यानंतर अमोल बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत रान पेटवले होते. भाजप नेते आणि अमोल बालवडकर यांच्या शाब्दिक चकमकी झाल्या…टोकाचे आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. अमोल बालवडकर यांच्या सोबत बाबुराव चांदेरे त्यांच्या पॅनल मध्ये होते. भाजपचे लहू बालवडकर विरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर आणि भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांच्यातील लढतीत कोण बाजी मारणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
प्रभाग क्रमांक 10 भुसारी कॉलनी, बावधन या प्रभागातही भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची अटीतटीची लढत मानली जात असली तरी भाजपचे पारडे जड असणाऱ्या या प्रभागात राष्ट्रवादी किती जागा खेचणार की भाजप पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करणार यासाठी उद्याची वाट पहावी लागणार आहे. भाजप किरण दगडे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे अभिजीत दगडे पाटील, भाजप दिलीप वेडे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे शंकर केमसे, भाजप अल्पना वरपे विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुजाता भुंडे आणि भाजप रूपाली पवार विरुद्ध राष्ट्रवादीच्या जयश्री मारणे अशी लढत होत आहे. या चारही लढती बाबत विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत.



प्रभाग 11 मध्ये रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. चार पैकी एक भाजपाच्या नगरसेविका मागील निवडणुकीत निवडून आल्या होत्या. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर व काँग्रेसचे चंदू कदम यांचे वर्चस्व आहे. वस्ती विभाग जास्त आणि सोसायटी विभाग कमी असणाऱ्या या प्रभागात वस्ती बरोबर सोसायटी भागातही कामे करत चांगला संवाद ठेवला आहे. मागील निवडणुकीत नगरसेविका असलेल्या छाया मारणे यांचे पती अजय मारणे यांना निवडणुकीत उतरवून नवी खेळी भाजपने खेळली आहे. राष्ट्रवादीचे हर्षवर्धन मानकर विरुद्ध भाजपचे अजय मारणे अशी या ठिकाणी लढत होत आहे. तर काँग्रेसचे चंदू कदम यांच्या विरोधात भाजपचे अभिजित राऊत अशी लढत आहे. आता या प्रभागातील मतदार कौल देणार हे पाहावे लागेल.
प्रभाग 29 डेक्कन जिमखाना, हॅप्पी कॉलनी हा प्रभाग भाजपसाठी ए प्लस असणारा प्रभाग आहे. मागील निवडणुकीत चार भाजपचे नगरसेवक या प्रभागात होते. तीच पुनरावृत्ती पुन्हा होण्याची चर्चा या प्रभागात आहे. भाजपचे पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर, मिताली साळवेकर हे भाजपचे उमेदवार या प्रभागातून निवडणुकीला सामोरे जात आहेत.
प्रभाग 30 कर्वेनगर होम कॉलनी मध्ये चारही गटात होणाऱ्या अटीतटीच्या लढतीकडे पुणे शहराचे लक्ष लागलेले आहे. मागील निवडणुकीत तीन भाजप एक राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्षीय बलाबल होते मात्र आताची निवडणूक रंगतदार होणार असून कोण निवडून येणार हे नक्की सांगणे अवघड आहे. भाजप समोर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केली असून शिवसेना शिंदे गटानेही प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले आहे. मतांची विभागणी कशी होतेय त्यावर या प्रभागातील गणित अवलंबून आहे. राष्ट्रवादीचे स्वप्नील दुधाने विरोध भाजपचे सुशील मेंगडे आणि शिंदे शिवसेनेचे विनोद मोहिते यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीबाबत सर्वांना उत्सुकता आहे. भाजपचे राजाभाऊ बराटे विरुद्ध राष्ट्रवादीचे विजय खळदकर यांच्यात होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार तर महिला ब गटात राष्ट्रवादीच्या संगीता बराटे विरुद्ध भाजपच्या रेश्मा बराटे यांच्यातील लढत ही लक्षवेधी आहे. क गटात भाजपच्या तेजश्री पवळे, राष्ट्रवादीच्या निवेदिता जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मनिषा शितोळे, शिंदे शिवसेनेच्या प्रतीक्षा जवळकर, अपक्ष तेजल दुधाने यांच्यात लढत होत असून विजयश्री कोण खेचून आणणार याबाबतची उत्सुकता आहे.
प्रभाग क्रमांक ३१ कोथरूड, मयुर कॉलनी मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना मनसे युतीचा सामना रंगणार आहे. शिवसेनेतून भाजप मध्ये प्रवेश करून सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करीत उमेदवारी आणलेले पृथ्वीराज सुतार आणि मनसेचे किशोर शिंदे या तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणारी लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तर ठाकरे शिवसेनेचे ॲड योगेश मोकाटे विरोध भाजपचे दिनेश माथवड ही लढतही तितकीच रंजक ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या किल्ल्याला शिवसेना मनसे युती सुरुंग लावणारा का याबाबतची उत्सुकता लागलेली आहे.
एकूणच उद्याचा निकालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार असून कोथरूड मतदार संघात काय ?कसे ?पक्षीय बलाबल राहणार आहे. एकूण सहा प्रभागातील २४ नगरसेवकांमध्ये भाजपचे किती आणि राष्ट्रवादीचे किती नगरसेवक निवडून येणार हाच विषय उद्याचा निकाल लागेपर्यंत चर्चेत राहणार आहे.



