आरोग्य

कोरोना संसर्ग शंका व समाधान
डाॅ.सचिन नागापूरकर

गेली सहा महिने झाले आज संपूर्ण भारतभर व जगात एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोना….कोरोना….आणि कोरोना…जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत ह्या कोरोना व्हायरस विश्वमारामारी मुळे. किती तरी लाख लोक आज संक्रमीत आहेत. लाखो लोक घरी तर तेवढेच लोक दवाखान्यात उपचार घेत आहेत. किती तरी हजारो लोक  व्हेंटिलेटर मशीनवर आहेत. दवाखान्यात रूग्णाला जागा, बेड मिळणे अवघड झाले आहे. सरकारी यंत्रणा वैद्यकीय यंत्रणा, डाॅक्टर,परिचारिका, रूग्णालयात काम करणारे कर्मचारी गेली सहा महिने झाले दिवसरात्र काम करत आहेत.काही चूका अथवा निष्काळजीपणा होत असेलही…पण त्यांची भावना अथवा ध्येय कधीच रूग्णांचे हाल व्हावेत म्हणून नाहीत.

अशीच काही परिस्थिती असताना काही लोकांच्या चुकीच्या पद्धतीने बोलण्यामुळे, माहिती पसरविल्यामुळे आज कोरोना व्हायरस संसंर्ग बद्दल काही लोकांनी थट्टा मस्करी सुरू केली आहे. कोरोना संसंर्ग नाहीच आहे. ही सगळी डाॅक्टरांची व सरकारी खेळी आहे. एक रूग्ण सापडला की दवाखान्याला इतके रूपये मिळतात. पैसे लुटण्यासाठी रूग्ण संख्या वाढवली जाते. गरज नसताना रूग्णाला दवाखान्यात भरती केले जाते. असे बरेच मेसेजेस फिरत आहेत. त्यामुळे भारतात ह्या रूग्णांचे प्रमाण आज जगाचा विचार केला तर वाढत चाललेले दिसत आहे. जगभरात विविध देशातील रूग्ण संख्या कमी होत आहे. कारण त्या देशातील नागरिकांनी सरकारचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले आहेत.

भारता सारख्या देशात लोकांनी मास्क घातला पाहिजे म्हणून पोलीस यंत्रणा काम करत आहे. दंड वसूल करत आहे. आपण आपली स्वतःची सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. पण कोणी तरी काही तरी कोरोना संसंर्ग कसा चुकीचा आहे असा मेसेजे पाठवतो व आपण हेच खरे समजून आपलेच नुकसान करून घेत आहोत.

मी जरी अस्थीरोग तज्ञ असलो तरी गेल्या सहा महिन्यात मी दवाखान्यात काम करत आहे. माझे मित्र सहकारी जे जनरल प्रॅक्टीस करणारे आहेत. काही फिजीशियन आहेत. त्यामुळे या परिस्थितीची मला जाणीव आहे. खरंच आज कोरोना व्हायरस संसंर्ग बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मला काही होणार नाही, मी फिट आहे, मी काळजी घेणार नाही, मी मास्क वापरणार नाही पण असे करू नका. कदाचित तुमची रोग प्रतिकार शक्ती चांगली असेल पण तुमच्या घरातील वयस्कर आई, वडिल ,आजी, आजोबा यांची प्रतिकार शक्ती कमी असेल. त्यांना कोणता तरी वैद्यकीय आजार असेल. त्यांना तुमच्या मुळे संसंर्ग होईल. ते आजरी पडतील ही गोष्ट लक्षात ठेवा.

ज्या परिवारातील लोकांना कोरोना संसंर्ग झाला आहे त्यांना विचारा किती परिस्थिती कठीण आहे. त्या रूग्णाला विचारा ज्याला लवकर दवाखान्यात भरती करता आले नाही त्याला किती त्रास झाला आहे. आजार भयंकर आहे असे आमच्या  डाॅक्टरांचे मत नाहीये…पण विनाकारण आजार अंगावर काढल्यामुळे, निष्काळजीपणा केल्या मुळे नक्कीच हा आजार जीवघेणा ठरू शकतो. वेळेत आपल्या डॉक्टरांना भेटून सल्ला घेणे आवश्यक आहे.

ह्या आजारावर लस कधी येणार? ती किती प्रभावी असणार? हे अजूनही स्पष्ट नाही. काळजी घेणे अंत्यत महत्वाचे आहे. विनाकारण बाहेर पडू नका.
सहा महिने झाले कोठेच गेलो नाही. चला पिकनिकला, चला गावाला शक्यतो हे टाळाच. सोशल डिस्टंसींग पाळा. मास्क चा वापर करा. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घ्या. स्वतः निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा, सकस आहार घ्या, व्यसने टाळा, दिर्घ श्वसनाचे व्यायाम करा, काळजी घेत सकाळी अथवा संध्याकाळी व्यायाम करा. आपली व आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी घ्या ज्यायोगे आपण लवकरात लवकर ह्या संसंर्गातुन बाहेर पडून आपले पुर्वीचे जीवन जगू शकू.

डॉ सचिन नागापूरकर (अस्थी रोग तज्ञ)

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये