पुणे शहर व जिल्ह्यातील मंगल कार्यालये, हॉल,लॉन्स, सभागृह ५० % क्षमतेने खुले करावेत- माजी आमदार चंद्रकांत मोकाटे

पुणे : सरकारने लॉकडाउनच्या काळात व अनलॉक प्रक्रियेत वेळोवेळी लग्न समारंभाकरिता नियमावली जाहीर केल्या होत्या. आता सर्व अनलॉक होत असताना मंगल कार्यालय हॉल, लॉन्स व सभागृह ५०% क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी.अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, माजी नगरसेवक प्रशांत बधे, ॲड. योगेश मोकाटे व पुणे शहर- ग्रामीण मंगल कार्यालय- लॉन्स असोसिएशनचे सद्स्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देत मंगल कार्यालये ५० % क्षमतेने खुली करण्याची मागणी केली आहे. सध्या अनलॉकच्या काळात आतापर्यंत ५० लोकांमध्ये लग्न सोहळा पार पाडण्याची परवानगी नियमावलीसह दिली आहे.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे म्हणाले, पुणे शहर व जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे कार्यालय, हॉल, सभागृह आहेत. या व्यवसायावर वराडी, वाढपी, आचारी, वाजंत्री, फुलवाले, सजावटकार, रोजंदारी कामगार, पारंपारिक वादक असे हजारो व्यावसायिक व कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. सदर व्यवसाय करणाऱ्या लोकांचे हातावरचे पोट असल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे.
सद्यस्थितीत सरकारने जिम, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल यांना ५० % क्षमतेने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याच तत्वावर पुण्यामधील हे कार्यालये, हॉल, लॉन्स व सभागृह व्यावसायिकांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेच्या ५० % क्षमतेने कार्यान्वयीत करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. व्यवसाय सुरु करण्यासाठी सदर व्यावसायिक व कर्मचारी शासनाच्या नियमावली प्रमाणे आरोग्य विषयी काळजी घेऊन कार्यरत होतील. तसेच सदर व्यावसायिकांचे व कर्मचाऱ्याचे यावर्षातील झालेले नुकसान भरून येण्यासाठी त्यांना हातभार म्हणून त्यांच्या मालमत्ता करामध्ये ५० % सवलत द्यावी.



