पुणे शहर

विधानसभेत आमदार भिमराव तापकीर यांनी उपस्थित केला संवेदनशील मुद्दा..

ताम्हिणी घाटातील अपघातात मृत्यू झालेल्या सहा तरुणांच्या कुटुंबासाठी केली ही मागणी..


पुणे : हिवाळी अधिवेशनात खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी मतदार संघात घडलेल्या एका दुखःद प्रसंगाबाबत संवेदनशील मुद्दा उपस्थित केला. कोकणात जात असताना मतदार संघातील ६ तरुणांचा ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कर्त्या मुलांच्या निधनामुळे कुटुंब उध्वस्त झाली आहेत. हा संवेदनशील मुद्दा उपस्थित करत एक महत्वाची मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत केली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या मुलांचे आई वडील धुणे–भांडी, घरकाम, मजुरी, बिगारी अशा अल्प उत्पन्नाच्या कामांवर कसेबसे उदरनिर्वाह करत असताना घरातील एकमेव कर्त्या तरुणांचा मृत्यू त्यांच्या अस्तित्वावरच आघात करणारा ठरला आहे. ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित नसून अत्यंत दुर्बल, वंचित आणि उपेक्षित कुटुंबांवर आलेले गंभीर आयुष्यनिर्वाहाचे संकट आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात Point of Information च्या माध्यमातून खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची दखल घेण्याची मागणी शासनाकडे केली.

Img 20251125 wa00126624322614302660332

आमदार तापकीर यांनी सभागृहात पुढील दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या—

१) मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीची, अर्थपूर्ण व समर्पक आर्थिक मदत जाहीर करावी..
भूतकाळात शासनाने अनेक दुर्घटनांमध्ये मानवी, संवेदनशील आणि सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर केली आहे.
त्या परंपरेनुसार या सहा कुटुंबांना तातडीने आर्थिक दिलासा मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

२) ताम्हिणी घाटातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात
धोकादायक वळणे सुरक्षित करणे, संरक्षण भिंती उभारणे, चेतावणी फलक, कॅट-आय रिफ्लेक्टर, सुरक्षा जाळी, वेगमर्यादा नियंत्रण आणि रस्त्याचे स्ट्रक्चरल सुधारणा करणे या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

आमदार तापकीर म्हणाले या सहा तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबांचा संपूर्ण भविष्याचा आधारच कोसळला आहे. शासनाच्या हस्तक्षेपामुळे या दुर्बल कुटुंबांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

कसा झाला होता अपघात

दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  या घटनेमुळे मतदार संघातील उत्तमनगर, कोंढावे धावडे परिसरात शोककळा पसरली होती. नवीन थार ने  कोकणाकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून वाहन सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने या अपघातात सहाही तरुणांचा मृत्यू झाला होता. मृतक सर्व तरुण अत्यंत गरीब, वंचित आणि कष्टकरी कुटुंबांतील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबांवर अपरिमित आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकट कोसळले आहे.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये