राज ठाकरेंना पुन्हा करोनाची लागण; शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे. मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. याचदरम्यान ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलीय.आधी कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय भूल (अॅनेस्थेशिया) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलेलं मात्र नंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे यांनी यापूर्वीच पुण्यातील सभेतून पायाच्या दुखण्याबाबत माहिती दिली होती. दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचंही त्यांनी सभेतून सांगितलं होतं. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याने राज ठाकरेंना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.









