रेमेडीसीवर इंजेक्शन महापालिकेने मोफत उपलब्ध करून द्यावे : पृथ्वीराज सुतार

स्थायी समितीकडे दिला ठराव
पुणे : रेमेडीसीवर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. सध्याच्या रुग्णांच्या बरे होण्याच्या संख्येवरून हे लक्षात येत आहे. परंतु हे इंजेक्शन पैशा अभावी सामान्य नागरिक घेऊ शकत नसल्याने पुणे महापालिकेने हे इंजेक्शन खरेदी करून ते आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
या संदर्भातील ठराव सुतार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे. शहरातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत परंतु रोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. सध्या रेमेडीसीवर या इंजेक्शनची चर्चा जोरात सुरू आहे. या इंजेक्शनचा प्रभाव रुग्णांवर चांगला पडत असल्याचे दिसत आहे. सधन घरातील लोक हे इंजेक्शन घेऊन आपल्या रुग्णाला देत आहेत पण गरीब घरातील नागरिकांना ते परवडणारे नाही. त्यामुळेच हे इंजेक्शन महापालिकेने खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सुतार यांनी सांगितले.
महापालिकेने हे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यास कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सुतार यांनी म्हंटले आहे.



