बुद्धीप्रामाण्यवाद संपल्यात जमा, NCERT च्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : माकडापासून मनुष्य हळूहळू उत्क्रांत होत गेला हा डार्विनचा सिद्धांत एनसीईआरटीनं ९ वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून काढून टाकल्यावर १८०० वैज्ञानिक, शिक्षक, प्रशिक्षक, प्राध्यापक आणि विज्ञानप्रेमींनी आपल्या सह्यांनिशी एक खुलं पत्रच एनसीईआरटीला लिहून या प्रकाराचा निषेध केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, अशीही भूमिका या पत्रातून मांडण्यात आली. आता यावर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी NCERT च्या या निर्णयावर आक्षेप घेतानाच खोचक टीका केली आहे. “चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झालं ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका. म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद हा आता संपल्यात जमा. म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील”, असं आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हे बदल आम्हाला मान्य नाहीत असे पत्रक देशभरातील अनेक शास्त्रज्ञांनी काढले आहे. विरोध केला जातोय हे कौतुकास्पद आहे”, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.







