राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निखिल गायकवाड

पुणे : आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व निखिल गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना पक्षाच्या पुणे शहर सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या पुढाकाराने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला आहे.
या प्रसंगी माजी आमदार व पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, मुस्लिम बँकेचे उपाध्यक्ष ऍड. आयुब शेख, अजय सावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहरात मागील वीस वर्षांपासून विविध लोकप्रिय दैनिकातून पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी – शांतीनगर येथून सलग तीन वेळा (1974 ते 1985) विनाप्रचार महापालिकेवर निवडून आलेले त्यांचे काका(चुलते) रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत, ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिवंगत विजयराव गायकवाड यांचा वारसा लाभल्यामुळे त्या माध्यमातून देखील त्यांची समाजात स्वतंत्र ओळख आहे.

फुले -शाहू -आंबेडकरी विचारधारेवर काम करत असताना त्यांनी त्यांच्या निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक विधायक उपक्रम तसेच अनेक प्रश्नांवर चांगल्या प्रकारे काम केलेले आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देखील सक्रिय असे काम केले. निखिल गायकवाड यांच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी एक प्रामाणिक,अभ्यासू नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.






