
पुणे : येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ एका इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यामधील या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.

वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांपासून तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली 10 कामगार अडकले. अडकलेल्या पाच जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे.
पुण्यामध्ये बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल समजल्यानंतर फार वाईट वाटलं. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती मी सांत्वना व्यक्त करतो. अपेक्षा करतो की, या अपघातामध्ये जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.



