“बाणेरवासीयांच्या आरोग्यासाठी पूनम विधाते यांची अजित पवारांकडे गार्बेज प्लांट हटवण्याची मागणी”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्षा पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने आज बाणेर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुस रोड बाणेर विकास मंचचे अध्यक्ष यांच्या हस्ते, “नोबल एक्स्चेंज, बाणेर गार्बेज प्लांट” बंद करणे व स्थलांतरित करणे या गंभीर प्रश्नासंदर्भातील निवेदन पूनम विधाते यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.यावेळी तात्काळ प्रतिसाद देत, अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका (PMC) आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले की प्लांट बंद करून तो स्थलांतरित करण्यासाठी तत्काळ जागेची निवड करावी आणि संपूर्ण प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी.
पूनम विधाते यांनी सांगितले की, “नागरिकांच्या समस्या सोडविणे हे माझे प्रातिनिधिक कर्तव्य आहे. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांची दखल घेऊन उपाययोजना व्हाव्यात, हीच माझी भूमिका आहे. बाणेर आणि परिसरातील नागरिकांच्या हितासाठी माझा संघर्ष असाच सुरू राहील.”
हा निर्णय बाणेर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणारा असून, स्थानिकांच्या आरोग्य व पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







