भाजप, शिवसेनेची जागा वाटपाबाबत बैठक; रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही

पुणे : महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
बैठकीला भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माधुरी मिसाळ, शहर अध्यक्ष धीरज घाटे तसेच शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार विजय शिवतारे, शहरप्रमुख नाना भानगिरे हे उपस्थित राहणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांवर टीका केल्याने तुम्हाला बैठकीला बोलावलं नाही का, या प्रश्नावर रवींद्र धंगेकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वंभूमीवर आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार आहेत. दुपार नंतर पुण्यात शिवसेना आणि भाजपा नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीचे मला निमंत्रण आले नाही. बैठकीचा निरोप आला तर मी जाईन, तसेच भाजपाची माझ्यावर नाराजी वाढते की कमी होते ते मला पाहावं लागेल. शिवसेनेला किती जागा मिळाव्यात, या प्रश्नावर ते म्हणाले, जागा वाटपाबाबत पहिली बैठक होत आहे. ही अंतिम बैठक नसून चर्चा होईल. तसेच मी एकनाथ शिंदे यांच्याकडे जागांबाबत म्हणणं मांडणार आहे.






