पुणे शहर

महिला व बाल सुरक्षेसंदर्भात नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे केली महत्वपूर्ण मागणी..

या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत केली चर्चा..

पुणे : पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरात दिनांक ०५ मे २०२६ रोजी ९ वर्षीय बालिकेवर अत्याचाराच्या प्रयत्नाची धक्कादायक घटना घडली असून, अलीकडेच नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्या यांसारख्या अमानुष घटनांमुळे संपूर्ण पुणे शहर व परिसरात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी पुणे पोलिसांकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे.

पर्वती आणि नसरापुर येथे घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केले आहे.

कोथरूड परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहती विकसित झाल्या असून, बाहेरून वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. मात्र संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी, ओळख, कायमस्वरूपी पत्ता, भाडेकरू नोंदणी व पोलीस पडताळणी याबाबत आवश्यक माहिती अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याने सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याची बाब मानकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

Img 20260222 wa00065926623401269940689

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी पोलिस प्रशासनाकडे केली महत्वपूर्ण मागणी

या पार्श्वभूमीवर बाहेरून वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची सक्तीची पोलीस पडताळणी, भाडेकरू नोंदणीची कठोर अंमलबजावणी, संशयित व्यक्तींवर नियमित निगराणी तसेच स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सुरक्षा समित्या व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची मागणी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे केली आहे.

महिला व बालकांची सुरक्षितता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रशासनाने केवळ तपासात्मक नव्हे तर कठोर, सातत्यपूर्ण व परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई तातडीने राबवावी, अशी मागणीही त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये