कर्वेनगर मधील सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कँडल मार्चच्या माध्यमातून रस्त्यावर

कर्वेनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कर्वेनगर मधील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. यावेळी काढण्यात आलेल्या कँडल मार्च मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
वारजे जकात नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या कँडल मार्चला सुरुवात झाली पुढे कॅनल रोडने विकास चौक, मावळे आळी चौक, पुढे स्पेन्सर चौक ते विठ्ठल मंदिर राजाराम पूल येथे समारोप करण्यात आला.
या कँडल मार्चमध्ये ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिलावर्ग, लहान मुले उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. भगवे झेंडे व मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले फलक हातात घेऊन, भगव्या टोप्या घालून सर्वजण या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते.







