शैक्षणिक

मुख्याध्यापक सुरज कुलकर्णी यांचा सेवापूर्ती निमित्त विशेष गौरव

पुणे – ” पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना यशस्वी नागरिक म्हणून उभे करण्यासाठी पायाभरणी करणारे आदर्श शिक्षक मुख्याध्यापक म्हणून सुरज कुलकर्णी यांचा गौरव करावा लागेल, असे मत राजकीय विश्लेषक ऍड. भाऊसाहेब आजबे यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिकेच्या माध्यमिक विभागातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक सुरज कुलकर्णी यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, युवा उद्योजक सुरेंद्र पठारे, निवृत्त महापालिका उपायुक्त वसंत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, माजी शिक्षणाधिकारी पोपट काळे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी दामोदर उंडे, विठ्ठल भरेकर, सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड यांच्यासह कुलकर्णी कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार व मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे होत्या. 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत सुरज कुलकर्णी यांनी इंग्रजी या विषया सोबतच विद्यार्थ्यांना शालेय शिस्त, बाह्य परीक्षा, आर.एस.पी. तसेच सांस्कृतिक व क्रीडा या विषयांमध्ये बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांचे असंख्य विद्यार्थी आज देश परदेशात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

त्यासोबतच जनगणना, मतदान या महत्वपूर्ण शासकीय कार्यामध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. भारतीय संविधान जनजागृती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता या विषयांवर देखील सरांनी सक्रिय कार्य केलेले आहे.

येरवड्यातील नेताजी बोस हायस्कूलमध्ये 33 वर्ष सेवा देणारे परिपूर्ण शिक्षक म्हणून सरांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापन सोबतच त्यापलीकडे जाऊन बहुआयामी “समाज शिक्षक” म्हणून काम केल्याचा उल्लेख शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांनी केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणींचा उल्लेख करत यशस्वी सेवापुर्ती निमित्त कौतुक केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक माजी विद्यार्थी तसेच त्यांच्या बालपणीचे मूळ गावाकडील सहकारी मित्र आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया आन्नलदास यांनी केले. निवेदन संगीता लांडे यांनी तर आभार ज्योती लोंढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यानिकेतन प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये