पुणे शहरशैक्षणिक

पुणे शिक्षक मतदारसंघातून सुनीलभाऊ जगताप यांची उमेदवारीची तयारी,शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार


पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनीलभाऊ जगताप यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289


शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेल्या ४५ वर्षांपासून शिवसेना विचारांशी एकनिष्ठपणे काम करत असल्याचे जगताप यांनी सर्व प्रथम नमूद केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक मान्यता, अशैक्षणिक कामे, वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी, बदली प्रक्रिया, वेतनाचे प्रश्न, पदोन्नतीतील अडथळे, जुनी पेन्शन योजना, DCPS-NPS, स्वायत्तता आणि वाढता प्रशासकीय ताण यांसारख्या विविध प्रश्नांचा त्यांनी आपल्या कार्यात सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले.


“शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवायचा असेल तर तो ठाम आणि प्रभावी असला पाहिजे. शिक्षकांचा सन्मान हा केवळ कागदावर नव्हे, तर समाजाच्या मनात निर्माण झाला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, कार्यशाळा आणि चर्चा सत्रांचे आयोजन, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, अध्यापनातील बदल आणि कौशल्य विकासासाठी शिक्षकांना सक्षम करण्यावर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.


“शिक्षक सक्षम असेल तर देश सक्षम होईल. प्रत्येक शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. शिक्षकांच्या हक्कांसाठी संघर्ष, सेवा आणि संघटन या माध्यमातून पुढील वाटचाल करणार आहे,” असे सुनीलभाऊ जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आगामी काळात व्यापक संपर्क अभियान राबविण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये