Video : दुकानात जुने गिऱ्हाईक दिसेना, नितीन गडकरींचे वक्तव्य चर्चेत

बुलडाणा : केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाबाबत केलेलं एक विधान चर्चेत आले आहे. सध्या आमचं दुकान चांगलं सुरू आहे. सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही, मात्र, जुने गिऱ्हाईक दिसेना, असं सूचक वक्तव्य गडकरींनी केलं.
खरे जुने गिऱ्हाईक
नितीन गडकरी म्हणाले, “दुकान चालायला लागतं तेव्हा गिऱ्हाईकांची कमतरता नसते. आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे. गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र, खरे जुने गिऱ्हाईक कुठे दिसेना.”
अनेक लोकांच्या तपश्चर्येतून, बलिदानातून सत्तेत
“माझ्यासारख्या लोकांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की, आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तुत्वामुळे नाही. असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीत दोन दोन वर्षे तुरुंगवास सहन केला. अनेक संकटं सहन केली, अनेक आंदोलनं केली. लाठ्या खाल्ल्या. या अनेक लोकांच्या तपश्चर्येतून, बलिदानातून आम्ही सत्तेत पोहचलो आहोत,” असं मत गडकरींनी व्यक्त केलं.
जे आहोत ते जुन्या कार्यकर्त्यांमुळे
“आम्ही जरी शिखरावर असलो, तरी या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेतलं नसतं, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसती. म्हणून आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.



