पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी

पुणे : राज्यभर अनेक ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्याचा सपाटा लावणाऱ्या भाजपने पुण्यातही खातं खोललं आहे. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे आणि 35 ड मधून श्रीकांत जगताप हे दोन उमेवदार बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप वि. दोन्ही राष्ट्रवादी वि. शिंदेंची शिवसेना वि. काँग्रेस-ठाकरेंची शिवसेना अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुण्याची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर अजित पवारांनीही पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या प्रभागात एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीमध्ये बाद झाले, तर इतर तीन जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. तर दुसरीकडे प्रभाग 35 ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे निवडणुकी आधीच भाजप दोन जागी विजयी झाला.यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.



