कर्वेनगरमध्ये कुस्ती स्पर्धेसाठी स्व. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरी आखाड्याचे भूमिपूजन..

कर्वेनगर : मैत्री प्रतिष्ठान आयोजित भव्य मातीवरील हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२ साठी कर्वेनगर मधील सम्राट अशोक विद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या स्व. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरी आखाड्याचे आणि मांडवाचे भूमिपूजन आज करण्यात आले.
यावेळी कर्वेनगर हिंगणे बु.मधील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोथरुड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय खळदकर व मित्र परिवार यांनी केले होते. ही हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा १४ व १५ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेची तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे.
खूप वर्षांनी कर्वेनगर भागात कुस्ती स्पर्धा होत असल्याने कुस्ती प्रेमी नागरिकांमध्ये स्पर्धेविषयी उत्सुकता दिसून येत आहे. या स्पर्धेसाठी स्व. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरी सज्ज करण्यात येत आहे. हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२ साठी कुस्ती आखाडा जोरदार रंगणार असून अटीतटीच्या कुस्त्या या आखाड्यात पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार असल्याचे विजय खळदकर यांनी सांगितले.




