विद्यार्थ्यांत भेदभाव करणाऱ्या शाळांवर कारवाई; पुण्यातील ‘त्या’ शाळेला नोटीस

मुंबई/पुणे : विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टय़ा त्रास देणाऱ्या, शुल्क भरले नाही म्हणून त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या किंवा त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणाऱ्या शिक्षण संस्थांची गय केली जाणार नाही, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिला आहे. पालकांना दमदाटी करणाऱ्या पुण्यातील उंड्री येथील शाळेलाही नोटीस देण्यात आली आहे.
पुण्यातील उंड्री येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही मुख्याध्यापकांना भेटायला गेलेल्या पालकांना दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची तक्रार केल्यानंतर या शाळेला शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी कृती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबत शुल्क वाढवणे, शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना त्रास देणे अशा स्वरूपाच्या पालकांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे सातत्याने येत आहेत. शुल्क भरले नाही म्हणून माध्यमिक वर्गातील काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार कांदिवली येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नुकताच घडला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत पोलीस तक्रार केली असून शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




