
पुणे : बावधन येथे सर्व सुविधायुक्त ५० बेडच्या मोफत कोविड केअर सेंटरचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सरपंच पियुषा किरण दगडे पाटील , नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर चालवले जाणार असल्याने समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरणार असल्याचे यावेळी चंद्रकांतदादांनी सांगितले.
या कोविड केअर सेंटरमध्ये २४ तास २ डॉक्टर व २ नर्स असणार आहेत. तर २ ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असून रुग्णांना मास्क, सॅनिटायझर दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहा, प्रतिकारशक्ती वाढवणारा काढा अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहे. तर रुग्णांसाठी बेड, मॅट्रेसेस, बेडशीट, पिलोव्ह, वाफ घ्यायचे भांडे, गरम पाण्याचे भांडे, कोलगेट, ब्रश, टॉवेल, पाणी बॉटल्स, टीश् पेपर, तेल अशा सर्व दैनंदिन वापराच्या वस्तूही पुरवल्या जाणार आहेत. ही सर्व व्यवस्था मोफत केली असून त्याचा भार सरपंच पियुषा किरण दगडे पाटील व नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी उचलला आहे.
नगरसेवक किरण दगडेपाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळं सर्वसामान्यांचे हाल झाले असताना गोरगरिब जनतेला मोठी झळ बसली आहे. त्यातच कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णांना भरमसाठ पैसै मोजावे लागत आहेत. त्यामुळे गोरगरिब रुग्णांची सोय होण्यासाठी समाजसेवेचं एक पाऊल म्हणून या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न केला आहे.



