वेळेत रिपोर्ट न देणाऱ्या खाजगी लॅब वर कारवाई करा : धुमाळ

पुणे : कोरोना स्वॅब टेस्ट करणाऱ्या खाजगी लॅबचालक आणि महापालिकेच्या आरोग्य विभागात योग्य समन्वय नसून खाजगी लॅबवरती पालिकेचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे शहरात कोरोना रुग्ण वाढत असून याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.
महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कोरोना स्वॅब टेस्ट व अॅन्टेजिन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू केले आहेत. याचबरोबर काही खाजगी दवाखान्यात व लॅब मध्ये सुध्दा या टेस्ट ची व्यवस्था कलेली आहे. परंतु ज्या खाजगी दवाखान्यात व खाजगी लॅब मध्ये टेस्ट केली जात आहे. त्यापैकी बऱ्याच लॅबमध्ये रिपोर्ट वेळेत दिले जात नसल्याने रिपोर्ट येईपर्यंत तपासणी केलेला रुग्ण सर्वत्र फिरत असतो. या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबात व आजुबाजुच्या परिसरात रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे.
त्याचबरोबर खाजगी लॅब मध्ये टेस्ट केल्या नंतर संबधित सोसायटी मधील व भागातील ज्या नागरिकांनी टेस्ट केलेल्या असतील त्या नागरिकांची पुर्ण माहिती संबंधित मनपाच्या अधिकारी व खात्याला देणे आवश्यक आहे. मात्र तशी माहिती दिली जात नसल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे या संदर्भात कडक धोरण राबविणे गरजेचे असून तशा प्रकारचे आदेश काढणे आवश्यक असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
खाजगी लॅब ने वेळेत रिपोर्ट न दिल्याने जर एखाद्या रूग्णाला त्रास झाला तर रिपोर्ट नसल्याने मनपा दवाखान्यात किंवा खाजगी दवाखान्यात उपचार करताना त्या रूग्णांना कोवीड की नाॅन कोवीड अशा प्रकारची संभ्रमावस्था निर्माण होते व अशा परिस्थितीत योग्य उपचार न मिळाल्याने काही वेळेस सदर रूग्णाला आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो. यासाठी अशा खाजगी दवाखाने व लॅबवर मनपा चे नियंत्रण व लक्ष असणे गरजेचे आहे. व ज्या खाजगी लॅब वेळेत व योग्य रिपोर्ट देत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.



