कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे कंत्राटी कामगार करताहेत वेतनाची प्रतिक्षा……!

कोथरूड : कोथरूड- बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांचे रोजचे जगणे मुश्कील होऊन बसले आहे. पगार नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या कंत्राटी कामगारांचा संताप वाढत चालला आहे.
कोथरूड- बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ३०१ कंत्राटी कामगार सन २००८ सालापासून अतिशय प्रामाणिकपणे रात्रंदिवस सफाईचे कामे करत आहेत. कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या कंत्राटी कामगांराना गेली ५ ते ७ वर्षे झाली महिन्यातून कधी २० दिवस तर कधी २२ दिवसच काम देऊन १२ किंवा १३,२००/- वेतन दिले जात असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.

माहे नोव्हेंबर – २०२३ चे वेतन अद्यापपर्यंत संबंधीत ठेकेदाराने अदा केले नाही. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त व महापालिका सहाय्यक आयुक्त यांना वेतन अदा करणे विषयी तोंडी चर्चा करून लेखी पत्रव्यवहार देखील केला गेला आहे. मात्र “कामाच्या निवेदिची मुदत संपली आहे पण सदर क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने वाढीव निवेदिच्या मान्यतेसाठी अतिरिक्त आयुक्त कार्यालयात दोन महिने झाले फाईल पाठवली आहे. तरी पण अतिरिक्त आयुक्त कार्यालयातून मान्यता आली नाही. अतिरिक्त आयुक्त साहेब लवकर वाढीव निविदा मान्य करा, २६ दिवस काम द्या, किमान वेतन द्या अशी मागणी कंत्राटी कामगार करत आहेत.



“महागाई वाढली पण पगार काही वाढेना आम्ही किती दिवस कमी पगारात काम करायचं, काय खायचं आम्ही, पोरांचं शिक्षण कसं करायचं..! घराचं भाड कसं द्यायचं, दिवाळीत आम्ही १४ दिवस बोनस मिळावा म्हणून आंदोलन केली पण आम्हाला बोनस देखील दिला नाही…! किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचा…! आमच्याच वाट्याला २२ दिवसाचा पगार का? २६ दिवसाचा पगार कधी मिळेल…! घाणीत रांत्र दिवस राबायचं आता तर आम्हाला दोन्ही पाळ्यात रस्त्याची स्वच्छता करावी लागत आहेत. दोन्ही पाळीत कामावर येण्यासाठी बस व रिक्षाला भाडे खर्च द्यावाच लागतो ना..! तो कसा द्यायचा..?असे अनेक प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत. २६ दिवस काम व वेतन द्या आणि तेही वेतन महिन्याच्या १० तारखेलाच अदा करा. अशी कंत्राटी कामगार करत आहेत.






