विजय डाकले यांची अपक्ष उमेदवारी कायम ; कोथरूड मतदार संघात चुरस वाढणार.. १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

कोथरूड : महायुतीतील पक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या विजय डाकले यांनी कोथरूड मतदार संघात भरलेला आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डाकले अर्ज मागे घेणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डाकले त्यांनी अर्ज कायम ठेवल्याने कोथरूड मतदार संघातील निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.
आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे कोण अर्ज माघार घेणार तर कोणाचा अर्ज कायम राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. कोथरूड मतदार संघात वैध झालेल्या २१ उमेदवारी अर्जां पैकी ९ जणांनी माघार घेतल्याने आता १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

महायुतीचे भाजपचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत मोकाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे, अपक्ष विजय डाकले हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार असून निवडणूक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी कडून योगेश राजापूरकर निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवार विजय डाकले हे निवडणूक आयोगाने दिलेल्या रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
आज अर्ज माघार घेण्यात आल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून खऱ्या अर्थाने उद्यापासून प्रचार सुरू होणार आहे.









