विविध मागण्यांसाठी मातंग समाज एकवटतोय ; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे : अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे सत्तेते येणाऱ्या प्रत्येक सरकार कडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने समाजामध्ये असंतोषाची लाट पसरू लागली आहे. समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आता सर्व पक्षातील मातंग समाजाचे नेते, पदाधिकारी मातंग स्पिक च्या माध्यमातून एकत्र येत असून विविध शहरांमध्ये बैठका होऊ लागल्या आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज एकवटला जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीला विविध जिल्हे व तालुक्यातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यात आली होती. त्यानुसार हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. समाजातील काही प्रतिनिधींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत शांत बसायचं नाही असं मातंग समाजाने ठरवले असल्याचे ठिकठिकाणी चालू असलेल्या बैठका, गाठीभेटी, ऑनलाईन बैठकांवरून दिसून येत आहे. मातंग समाज एकत्र येत असताना राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आगामी काळात काय करणार हे पहावे लागणार असून या समाजाची वाढत चाललेली नाराजी दूर करणं हे सरकार पुढील आव्हान असणार आहे.
माजी मंत्री, काँग्रेस चे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष विजय डाकले, प्रदेशाध्यक्ष, आर.पी.आय.( A) मातंग आघाडी हनुमंत साठे, प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, संस्थापक अध्यक्ष डी.पी. आय सुकुमार कांबळे, पुणे महापालिकेतील नगरसेवक सुभाष जगताप, अविनाश बागवे, विदयार्थी सेना काँ. आय प्रदेशाध्यक्ष मनाेज कांबळे, आमदार राजीव आवळे, समन्वयक कॉ.आय रविद्र दळवी, उपाध्यक्ष रा. कॉ. पि. चिं.शहरजिल्हा संदीपान झोंबाडे, दिल्ली विदयापीठातील डॉ. मिलींद आवाड, उपाध्यक्ष क्रांतिवीर लहुजी साळवे आयोग म.राज्य दिलीप आगळे, इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक अब्राहम आवळे, संस्थापक-अध्यक्ष रा. ब. विकास महासंघ, शिवसहकार जिल्हाध्यक्ष पुणे बाळासाहेब भांडे, शिव उद्योग सहकार सेना, महाराष्ट्र राज्य चिटणीस अनिल हातागळे, अध्यक्ष अ. भा.ब.सेना निलेश वाघमारे, संस्थापक अध्यक्ष द. यु. आंदाेलन म. राज्य सचिन बगाडे, लाेकस्वराज्य जनआंदाेलन प्रा. रामचंद्र भरांडे, संस्थापक न्यु.टायगर सेना प्रभाकरजी लोंढे, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, साहित्यिक सुरेश पाटाेळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दादाभाऊ आल्हाट यांच्या माध्यमातून समाज एकत्र करण्याचे काम जोरात सुरू आहे.
अशा आहेत मातंग समाजाच्या मागण्या
१)साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार मिळण्याकरता महाराष्ट्र राज्य शासनान ठराव करून केंद्र शासनाकडे पाठवावा. २)अनुसूचित जातीचे अ ब क ड याप्रमाणे वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळण्या कामी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करावी, ३)विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार नेमणुकीबाबत मातंग समाजातील प्रतिनिधीला संधी द्यावी
४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी ) ची स्थापना करावी. ५)साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील स्मारक तसेच पुणे येथील क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून त्यांची कामे त्वरित सुरू करावीत. ६) महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या नावे अध्यासन केंद्रे सुरू करावीत. ७)साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी साठी १०० कोटीचा मंजूर निधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अखर्चित राहिला होता सदर निधी २०२० – २०२१ यावर्षी साठी वर्ग करावा.



