सायकल ट्रॅकवर बसविण्यात आलेल्या बोलार्डचा सायकल चालकांना होतोय अडथळा

सातारा रस्त्यावरील प्रकार ; भरत सुराणा यांच्याकडून आयुक्तांना पत्र
पुणे: सातारा रस्त्यावर करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. आतापर्यंत या कामामध्ये अनेक प्रकारचे बदलही केले गेले आहेत. सध्या या सायकल ट्रॅकवर चुकीच्या पद्धतीने बोलार्ड बसविण्यात आले असल्याने सायकल चालवताना ते चालकांच्या पायाला लागत आहेत. त्यामुळे या ट्रॅक वरून सायकल चालवण्यापेक्षा ती रस्त्यावरून चालवण्याकडे जास्त कल वाढत आहे. मुळात सायकल ट्रॅक हे सायकल चालकांना वीना अडथळा सायकल चालवता यावी असे असायला हवेत मात्र अशा चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असलेल्या कामामुळे मूळ उद्देश बाजूला राहत असल्याचे पुढे येत आहे.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे व ढिसाळ कारभारामुळे सायकल ट्रॅक सायकल चालकांना वापरता येत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भरत सुराणा यांनी केला आहे. सायकल ट्रॅकवर सायकल चालविण्यास त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. सायकल ट्रॅकवर केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे सायकल चालक ट्रॅकचा वापर न करता मुख्य रस्त्यावरूनच सायकल चालवणे पसंद करत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सदर चुकीच्या कामाबाबत सुराणा यांनी आयुक्त यांना संबंधित सातारा रस्त्यावर सायकल चालविण्यास निमंत्रण दिले आहे. त्याबाबत आयुक्तांनी वेळ कळविल्यानंतर सायकल व हेल्मेट नागरिकांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सायकल चालकांना सायकल ट्रॅकवरून सायकल चालविताना होणारा त्रास आणि त्यामुळे करोडो रुपये खर्च करून वापराविना पडून असलेला सायकल ट्रॅक याची पाहणी आयुक्तांनी स्वतः करावी आणि यातून सायकल चालकांसाठी मार्ग काढावा. अशी मागणी सुराणा यांनी पत्राद्वारे केली आहे.













