कर्वेनगरमध्ये जय मातादी नवरात्र उत्सव संस्थेच्या वतीने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी भेट देऊन सन्मान..

कर्वेनगर : karvenagar जय मातादी नवरात्र उत्सव संस्था, कर्वेनगर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त कर्वेनगर परिसरातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साड्या भेट देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे उत्सवात परंपरा जपत सामाजिक भान जपण्याचा आदर्श या संस्थेने घालून दिला आहे.

कर्वेनगरमध्ये गेल्या तीस वर्षांपासून जय मातादी नवरात्र उत्सव संस्था उत्सव भक्तिभावाने साजरा करत आहे. संस्थेचे संस्थापक कै. विठ्ठल आण्णा कोंढरे यांच्या मार्गदर्शनातून स्थापन झालेल्या या मंडळाला परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आला आहे.
यावर्षीच्या उत्सवासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सचिन फोलाने, उत्सव प्रमुखपदी मीना मोरे, उपाध्यक्षपदी दिग्विजय कोंढरे, सचिवपदी बाळकृष्ण निढाळकर, कार्याध्यक्षपदी संतोष वरक, खजिनदारपदी सचिन वाडकर यांची निवड झाली आहे. तसेच योगेश खरात व अशोक कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.



या निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांनी आज कर्वेनगर परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी भेट देऊन सन्मान केला. प्रत्येक क्षेत्रात काम करणारी महिला ही माँ दुर्गेच रूप आहे. या स्वच्छता महिला कर्मचारी ही स्वच्छतेचं काम करून समाजाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मोठं काम करत आहेत. म्हणूनच नवरात्र उत्सवानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे अध्यक्ष सचिन फोलाने यांनी सांगितले.
स्वच्छता कर्मचारी महिलांचा साडी भेट देऊन सन्मान करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत उत्सवाचे आनंद वाटप व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. नवरात्र उत्सवाबरोबरच संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यांचा विशेष समावेश आहे.


