पुणे शहर

बघा महापालिकेच्या कोणत्या शाळेत बहरलीये औषधी वनस्पतींची बाग

पुणे : शुक्रवार पेठेतील महानगरपालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील शाळेत फळांची व औषधी वनस्पतींची बाग फुलत आहे. ही बाग फुलवण्यासाठी माजी मुख्याध्यापिका सिमा चव्हाण यांनी घेतलेल्या मेहनतीला आता यश मिळत असल्याचे दिसत आहे.

मागील काही महिन्यात करोना आजाराच्या संसर्ग काळात पूर्ण जगाला निसर्गाचे व खाण्यात नैसर्गिक फळे व भाज्या यांचे महत्व समजले आहे.  करोना आजारावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यास खाण्यात आवळा, तुळस असे देशी उपाय वापरण्यात आले व त्याचा उपयोगही झाल्याचा पाहिला मिळाले.

Img 20201028 wa0145

पण मागील चार वर्षापूर्वीच विद्यार्थ्यांना झाडे व त्यांचे संगोपन यांचे महत्व समजावे, त्यांना देशी फळे व औषधी वनस्पतींचे गुणधर्म मिळावे यासाठी मुख्याध्यापिका सिमा चव्हाण यांनी शाळेतच  औषधी वनस्पतींची बाग स्वखर्चाने फुलविण्यास सुरुवात केली. कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजिराव  मुळीक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले होते.

शाळेत शतावरी, आवळा, वाळा, अडुळसा, कढीपत्ता, दगडी पाला, ओवा, ब्राम्ही, तुळस, गवती चहा, आले यासोबत केळीची लागवड करण्यात आली आहे. आज या सर्व वनस्पती जोमाने वाढत आहेत. येथे झाडांना येणाऱ्या फळांचा आस्वाद शाळेतील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

सिमा चव्हाण म्हणाल्या की,  महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व अनेक संकटांवर मात करून शिकत असतात. मी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थी प्रार्थनेच्या वेळेला भोवळ येऊन पडलेले पाहिले आहे. चौकशी केल्यावर असे समजले की, विद्यार्थी अर्धपोटी शाळेत येत आहेत. तेव्हा पासून माझे एक स्वप्न होते की शाळेत औषधी वनस्पतींची बाग असावी. त्यांना देशी झाडांचे महत्व समजावे, त्यांना ताजी फळे खाण्यास मिळावी या हेतूने मुख्याध्यापक पदी कार्यरत असताना हा उपक्रम सुरू केला. त्याला यश मिळाले. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बागेची चांगली निगा राखली आहे.

Img 20201024 wa0166 1

करोनाच्या काळात कसलीही पर्वा न करता सुरक्षारक्षक सतीश थोरात यांनी नियमितपणे पाणी देऊन बागेतील झाडे टवटवीत ठेवली आहेत. अशा निसर्ग हिताच्या उपक्रमाचा इतर शाळांनीही आदर्श घेणे आजच्या काळाची गरज आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये