कर्वेनगरमधील वडारवस्ती, श्रमिक वसाहतीमध्ये नागरिकांच्या संपूर्ण संमतीविना कोणतीही कार्यवाही केली जाऊ नये ; स्वप्नील दुधाने यांची एसआरए अधिकाऱ्यांकडे मागणी

दोन दिवसापूर्वी कर्वेनगर मधील वडार वस्ती -श्रमिक वसाहत एसआरए सर्व्हे वेळी निर्माण झाला होता तणाव
कर्वेनगर : कर्वेनगर मधील वडार वस्ती श्रमिक वसाहतीमध्ये दोन दिवसापूर्वी अचानक पोलीस फौज फाट्यासह एसआरए, अधिकारी आणि विकासाचे कर्मचारी यांनी सर्वे सुरू केल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या रोषणानंतर त्या दिवशी सर्व्हे थांबवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली आहे.
या संदर्भात आज स्वप्नील दुधाने यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-पुणे क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके आणि त्यांच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी अधिकारी क्र. २ मा. अर्चना यादव यांची भेट घेतली आणि या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.

नागरिक सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांचा सदर उपक्रमास विरोध आहे. यामुळे नागरिकांचे हक्क आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी नागरिकांच्या संपूर्ण संमतीविना कोणतीही कार्यवाही केली जाऊ नये, अशी मागणी स्वप्नील दुधाने यांनी अधिकाऱ्यांकडे केली तसेच यावर सकारात्मक विचार न झाल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा ही त्यांनी दिला.
याप्रसंगी अधिकारी वर्गानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून नागरिकांच्या या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांच्या हक्कांसाठी सदैव कटिबद्ध आहोत असे स्वप्नील दुधाने यांनी म्हंटले आहे.






