शांतीबन सोसायटी समोरील पीएमपीएमएल ताब्यातील जागेवर उद्यान विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार : किरण दगडे पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून या उद्यानासाठी प्रयत्न करणार…
कोथरूड : शांतीबन सोसायटी समोरील पीएमपीएमएल ताब्यातील जागेमध्ये स्थानिक नागरिकांच्या गरजेचा विचार करून उद्यान विकसित करण्याची मागणी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांची उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
या संदर्भातील पत्र किरण दगडे पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले असून वरील मागणी करतानाच त्याची कारणमीमांसा पत्रात मांडली आहे. हे उद्यान स्थानिक नागरिकांसाठी कसे गरजेचे आहे आणि पीएमपीएमएलसाठी पर्यायी उपलब्ध जागेचा उल्लेख करत या ठिकाणी ते कसे साकारता येईल याकडे त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले आहे.

किरण दगडे पाटील यांनी म्हंटले आहे की, कोथरूड मधील शांतीबन सोसायटी समोरील सर्वे क्र. ७९/१६ ही जागा दाट लोकवस्तीच्या एकदम मध्यभागी असून नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. सध्या येथे पीएमपीएमएलचे पार्किंग तसेच बस रिपेयरिंग सेंटर कार्यरत आहे. यामुळे या निवासी परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी व धुराचे प्रदूषण निर्माण करणारी ही गतिविधी नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या जागेवर उद्यान विकसित केल्यास स्थानिक नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले- आराम, व्यायाम आणि निरोगी वातावरणाचा मोठा लाभ होईल. कुमार परिसर, महात्मा सोसायटी, डीपी रस्ता परिसर, शास्त्रीनगर, मौर्य विहार, शांतीबन या भागातील नागरिकांना या उद्यानाचा लाभ होईल. आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.



तसेच पीएमपीएमएलचे सध्याचे पार्किंग व रिपेयरिंग सेंटर शेजारील पुणे-बेंगळूर महामार्गालगत सर्वे क्र. ६९ मधील आरक्षित असलेल्या उपलब्ध 1.5 एकर जागेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधित विभागांशी आवश्यक चर्चा करून योग्य निर्णय झाल्यास शांतीबन येथील जागेवर उद्यान विकसित करणे शक्य होईल, त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष देऊन उद्यानाचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती किरण दगडे पाटील यांनी केली आहे.






