रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आम्ही केलेल्या सामाजिक कामाला या भागातील लोक निश्चित पणे न्याय देतील-हर्षवर्धन मानकर
कांता नवनाथ खिलारे आणि तृप्ती निलेश शिंदे यांनीही मानकर यांच्या समवेत केला उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर येथील अधिकृत उमेदवार म्हणून हर्षवर्धन दीपक मानकर यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे नामनिर्देशन पत्र सादर केले.
रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अ गटातून हर्षवर्धन दीपक मानकर, ब गटातून तृप्ती निलेश शिंदे, क गटातून कांता नवनाथ खिलारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची आणि लोकहिताला प्राधान्य देण्याची माझी भूमिका आहे. गेली अनेक वर्षे माझे वडील दीपक मानकर हे या प्रभागात नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. मी देखील गेली सात ते आठ वर्षे याठिकाणी लोकांसाठी काम करत आहे.
आम्ही केलेल्या सामाजिक कामाला या भागातील लोक निश्चित पणे न्याय देतील आणि मला प्रचंड मतांनी विजयी करतील असा मला विश्वास आहे. या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.




