बार्टीमुळेच यूपीएससी उत्तीर्ण होऊ शकलो : राहुल कांबळे

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेने मला दिलेल्या शिष्यवृत्तीमुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील मुलगा यूपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या सहाय्यक संचालक सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयात अधिकारी म्हणून रुजू झाला, अशा भावना बार्टीची शिष्यवृत्ती घेतलेल्या राहुल कांबळे यांनी व्यक्त केल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेतील संशोधक विद्यार्थी राहुल कांबळे यांनी दिनांक ४ मार्च २०२६ रोजी बार्टी संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांचा विभागप्रमुख रविंद्र कदम, डॉ. बबन जोगदंड, शुभांगी पाटील, लेखाधिकारी नितिन चव्हाण यांच्या हस्ते भारताचे संविधान, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.



याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. जोगदंड म्हणाले की, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेत बार्टीचे विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार व नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे. बार्टीचे युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी राहुल कांबळे यांनी पीएचडी करत असताना स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास केला. त्यात त्यांनी यश मिळवले. बार्टीच्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व नागरी सेवेत अधिकारी म्हणून बार्टीचा नावलौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांनी अधिकारी झाल्यानंतर बार्टीकडे आणि नव्या विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन करुन बार्टी संस्थेच्या वतीने त्यांनी राहुल कांबळे यांचे अभिनंदन केले.
सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सारिका थोरात, डॉ. अंकुश गायकवाड, विकास गायकवाड, धीरज खाडे, अमिर मुलानी यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन विकास गायकवाड यांनी केले.
आभार रामदास लोखंडे यांनी मानले.



