रखडलेल्या पावसाळी वाहिन्यांच्या कामाचा मुहूर्त कधी? पुण्यात महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार

पुणे– पावसाचे पाणी साचल्यामुळे निर्माण होणारी दरवर्षीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला यंदा मुहूर्त सापडला खरा मात्र उपाय योजनेसाठी सुरू केलेल्या कामालाच विलंब होत असल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गंभीर बाब म्हणजे काम सुरू करून एक महिना झाला तरी देखील अत्यंत संथगतीने सुरू असणाऱ्या कामावर कोणाचेही नियंत्रण नाही. उलट उपयोजना करण्यासाठी केलेल्या कामामुळेच अपघात निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. येरवड्यातील प्रभाग क्रमांक दोन येथील अग्रसेन हायस्कूल ते कॉमरझोन रस्त्यावर मोठ्या व्यासाच्या पावसाळी वाहिन्या बसवण्याचे काम संथ गतीने सुरू असून कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणते उपाय योजना न केल्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येईल असे मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथील अग्रसेन हायस्कूल ते कॉमरझोन रस्त्यावर दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत असतात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी या महत्त्वपूर्ण कामासाठी महापालिका प्रशासनाला मुहूर्त सापडला. मागील महिन्यात NDMA अंतर्गत मोठ्या व्यासाच्या पावसाळी वाहिन्या बसविण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली. त्याकरिता रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली असून त्यामध्ये पाणी व गाळ साचलेला आहे. कॉमरझोन कडे वळताना हा मोठा खड्डा असून त्यामध्ये अनेक केबलच्या वाहिन्या अस्ताव्यस्त पडलेले आहेत. खोदाई केलेला राडाराडा देखील रस्त्याच्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भागापर्यंत पसरलेला आहे. या परिसरात दोन मोठ्या शाळा असून कॉमरझोन आयटी पार्क मुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. एकंदरीत या सर्व परिस्थितीत या ठिकाणी मोठा गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे काम पंधरा दिवसांपासून बंदच असल्याचे लक्षात आले. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाच वेळी ड्रेनेज विभागाचे काम सुरू असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केबल वाहिन्या देखील टाकण्यात येत असल्याचे लक्षात येते. कदाचित एका कामासाठी परवानगी घेऊन इतर विभागाची खाजगी ठेकेदारांची कामे अधिकाऱ्यांना हाताशी पकडून कदाचित सुरू असावीत अशी देखील शंका निर्माण होत आहे. एकंदरीतच पावसाळी वाहिन्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अशाप्रकारे ठेकेदाराकडून कामाला होणारा विलंब, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून सर्वकाही अलबेल असल्याचे लक्षात येते. सदर ठिकाणी तातडीने कामाला सुरुवात करून सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांसह काम लवकरात लवकर वेळेत पूर्ण करावे. तसेच कामासाठी विलंब करणारे ठेकेदार व दुर्लक्ष करणारे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर देखील कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष निखिल गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.






