वारजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते हायवे चौकापर्यंत प्रस्तावित मेट्रोसाठी डबल डेकर उड्डाण पूल करण्याची मागणी…

नगरसेविका तेजश्री पवळे यांनी केंद्रीय मंत्री,मुरलीधर मोहोळ यांना दिले निवेदन
कर्वेनगर : वारजे येथील आंबेडकर चौक ते हायवे चौक येथील प्रास्तावित मेट्रोसाठी डबल-डेकर उड्डाणपूल उभारण्याची मागणी नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. यावर खासदार मोहोळ यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी तेजश्री महेश पवळे यांनी सविस्तर निवेदन सादर करीत पौड फाटा ते वनदेवी पर्यंत होत असलेल्या डबल-डेकर उड्डाणपूल हा पुढे कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलावरून मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्याची मागणी केली. सध्याच्या आराखड्यानुसार हिंगणे होम कॉलनी परिसरातील सुमारे १८ घरे बाधित होण्याची शक्यता असून, पर्यायी आराखडा स्वीकारल्यास नागरिकांची घरे वाचतील, अनावश्यक भूसंपादन टळेल आणि शासनाचा खर्चही कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वारजे हायवे चौक या दरम्यानही भविष्यातील वाहतुकीचा विचार करून वाहनांसाठी स्वतंत्र उड्डाणपूल व त्यावर मेट्रो मार्गासह डबल-डेकर उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पुणे शहराला दीर्घकालीन आणि सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नागरिकहित, शहराचा नियोजनबद्ध विकास आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती सौ. तेजश्री महेश पवळे यांनी केंद्रिय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे केली.



