महापौर, आयुक्त लाखो रुपये खर्चून खोटी झाडे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा : दिपाली धुमाळ

पुणे : महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरास अजून पुर्णपणे ग्रीन कव्हर होण्याच्या उददेशाने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. मात्र एकीकडे पुणे महापालिकेकडून वृक्ष लागवड करणेऐवजी लाखो रुपये खर्चून खोटी बोलकी झाडे लावली जात आहेत, तर दुसरीकडे पुणे महापालिकेकडे महावितरण कंपनीचे वीजेची थकबाकी भरण्यास पैसे नाहीत अशा गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे खोट्या झाडांवरील उधळपट्टी थांबवून खरी ऑक्सीजन देणारी झाडे लावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. Instead of planting fake trees at the cost of lakhs of rupees, plant real trees that provide oxygen: Deepali Dhumal
या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी महापालिका आयुक्त व महापौरांना दिले आहे. महानगरपालिकेकडून कोथरूड येथील उद्यानामध्ये ८८ लाख रूपये खर्च करून झाडे बसवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असून शहरातील अनेक विकासकामे आपण थांबविली आहेत. पुणेकरांनी मनपाच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून कोटयावधींचा भरणा कोरोना काळात उत्पन्न घटले असतानाही मनपावर विश्वास ठेवून केला आहे. याचा गैरफायदा सत्ताधारी पक्षाच्या दबावाने प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
महापालिकेकडून खरी झाडे लावण्यापेक्षा लाखो रुपये खर्चून खोटी बोलकी झाडे लावली जाणे ही कोरोना काळात दुर्देवी बाब आहे. वास्तविक पुणे महापालिकेकडून मनपा हददीत सर्वत्र पायाभूत सेवा व सुविधा, रूग्णालयाच्या सुविधा सुसज्ज झाल्यानंतर शहराचे सुशोभिकरण करणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या रूग्णांना बेडस उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, विलगीकरण कक्षामध्ये सुविधा नाहीत अशी दयनीय अवस्था असताना प्रशासनाकडून ८८ लाखांच्या सुशोभिकरणाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जाणे हे महापालिकेस व पुणे शहराच्या संस्कृतीला अशोभनीय असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

राज्य शासनाकडून शक्य तितकी कामे पुढे ढकलण्याचा आदेश महापालिकेस प्राप्त असताना महापालिका प्रशासनाकडून त्यास हरताळ फासला जात आहे. महापालिका प्रशासनाकडून कोरोना काळापासून या वर्षभरात ज्या ज्या ठिकाणी सुशोभिकरणाची कामे चालू आहेत, ती सर्व कामे तातडीने स्थगित करणेबाबत आयुक्तांनी आदेश पारित करावेत अशी मागणी धुमाळ यांचेकडून करण्यात आली आहे.



