केंद्र सरकारकडून काैतुक तर मुंबई हायकाेर्टाकडून पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड : धुमाळ

पुणे : पुणे शहरात काेराेनाने शिरकाव केल्यापासून प्रशासन 24 बाय 7 काेराेना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय याेजना अंतर्गत काम करीत आहे. मात्र महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात काेराेनाचे रूग्ण माेठया प्रमाणात वाढत चालले होते. परंतु राज्य शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे काेराेना रूग्णांची संख्या सध्या कमी हाेत असताना दिसत आहे. आता एकीकडे केंद्राकडून रुग्ण कमी झाले म्हणून पुणे महापालिकेच्या कौतुकाच्या बातम्या येऊ लागल्या असल्या तरी दुसरीकडे मुंबई हायकाेर्टातून पुणे मनपा हेल्पलाईनवरील दूरध्वनीवर फोन करून बेडची उपलब्धता विषयी चाैकशी केली असता व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे महापालिकेतील कारभाराचे वाभाडे निघाल्याची टीका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ यांनी म्हंटले आहे की, पुणे शहरातील काेराेना विषयक स्थितीचा आढावा जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व प्रशासकीय अधिका-यांसमवेत सतत घेत असतात. पुण्याच्या परिस्थितीवर ते कायम लक्ष ठेऊन असून सातत्याने प्रशासनाला सूचना देत असतात.

आज केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेचे काैतुक केल्याच्या बातम्या आल्या असून पुणे महानगरपालिका प्रशासन करत असलेल्या कामाची ती पावतीच आहे. मात्र प्रशासनाकडून व सत्ताधारी भाजप कडूनही कामे करत असताना काही ठिकाणी ढिसाळपणा होत आहे व त्यामुळेच मुंबई हायकाेर्टातून पुणे मनपा हेल्पलाईनवरील दूरध्वनीवर फोन आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.



डॅशबाेर्डवर जागा उलपब्ध दिसत असून प्रत्यक्षात फोन केले असता जागा नाही असे सांगण्यात येते, मनपाने काेविड रूग्णालये उभारलेली असून खाजगी रूग्णालयातील बेडस ताब्यात घेतल्याचे जाहिर केले. परंतू प्रत्यक्षात खाजगी रूग्णालयातील बेडस ताब्यात घेतलेले आहेत का ? याबाबत साशंकता असून याबाबत खुलासा करावा तसेच खाजगी रूग्णालयात उपचाराचा येणारा खर्च व त्यांनी अदा केलेली बिले याची तपासणी तक्रारीनंतर महापालिकेमार्फत केली जाते असे सांगण्यात येत असून याबाबत आजपर्यंत किती पुणेकरांना याचा फायदा झाला आहे याचाही खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
केंद्र सरकारने पुणे महापालिकेचे काैतुक केल्यानंतर भाजपचे पदाधिकारी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असून प्रशासनाचे काैतुक करण्याचे माेठे मन त्यांच्याकडे नाही. आमची आयुक्तांना विनंती आहे की, चांगल्या कामाचे काैतुक आम्ही नक्कीच करतो, पण यंत्रणेतील नागरिकांना मनस्ताप सहन कराव्या लागणाऱ्या त्रुटी ही दुरूस्त केल्या पाहिजेत असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.






