एड्सग्रस्त भगिनींबरोबर राखीपोर्णिमा साजरी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अनोखा उपक्रम
पुणे : कात्रज येथील ममता फाउंडेशनमधील एचआयव्ही बाधित अनाथ निराधार मुलांनी रक्षाबंधनाचा आनंद घेतला. संस्थेतील मुलींनी स्वतः बनविलेल्या राख्या बांधून सण साजरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.
गिरीश गुरनानी म्हणाले,राखी पौर्णिमेनिमित्त ममता फाउंडेशन संस्थेला भेट दिली. एड्सग्रस्त मुलींसाठी कार्य करण्यात आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात अग्रेसर अशी ही संस्था आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या भगिनींना बघून मन भरून आले. त्यांच्याकडून राखी बांधून घेत असताना त्यांच्या डोळ्यातल्या आशा आकांक्षा किती मोठ्या आहेत आणि स्वतंत्र जगण्याची उमेद किती जागृत आहे याची अनुभूती झाली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी या चिमुकल्या पण स्वाभिमानी भगिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या अनेक वस्तू विकत घेतल्या. या वस्तू जसे की राख्या, गिफ्ट बॉक्स, कागदापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी अतिशय सुंदर आहेत.या उपक्रमात अमोल गायकवाड, प्रीतम पायगुडे, संदेश कोतकर, रवी गाडे, सौरभ ससाणे, आकाश नागरे सहभागी झाले होते.



