भारतीय लोकशाहीत आजही निवडणुका भावनिक लाटेवर लढविल्या जातात : जेष्ठ लेखक राजन खान

पुणेः- सर्वात मोठी लोकशाही यंत्रणा म्हणून जागतिक स्तरावर अभिमान्स्पदरित्या गाैरविले जात असतांना आजही भारतीय लोकशाहीत निवडणुका वस्तुनिष्टठतेपेक्षा भावनिक लाटेवर लढविल्या जातात, हे खेदाने नमूद करावेसे वाटते, असे मत ज्येष्ठ लेखक आणि अक्षर मानव संस्थेचे प्रमुख राजन खान यांनी व्यक्त केले.
ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक १२ ते १६ डिसेंबर दरम्यान वारजे जकात नाका भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजीत भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेत ‘लोक आणि लोकशाही’ या विषयावर प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखक राजन खान यांचे व्य़ाख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या तिसऱ्या षुष्पाचे अध्यक्ष शानू पटेल, ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेचे संयोजक नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि साहित्यीक वि.दा.पिंगळे उपस्थित होते.
खान म्हणाले, अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्ध, बसवेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर आणि महावीर यांसारखे महापुरुष होऊन गेले आणि त्यांनी सत्याचा मार्ग दाखविला. पंरतू, तो मार्ग न स्विकारता त्याकडे कानाडोळा करीत सोयीस्कर मार्ग प्रत्येकवेळी स्विकारला गेला. त्यामुळे दर शतकात कोणी ना कोणी महापुरुष जन्माला यावा लागतो आणि तोही तेच सांगतो तरीही आजही प्रजा सुज्ञ झालेली नाही, ही शोकांतिका आहे.

अभिव्यक्ती हा लोकशाहीचा पाया आहे, पंरतू तो पायाच कमकुवत केला जात आहे. लोकशाही अजून आपल्याला कळलीच नाही. लोकशाही म्हणजे दुस-याला सहन करण्याची ताकद. परंतू आजही जातीयवाद, भेदाभेद, श्रीमंत-गरीब भेदाभेद आजही अस्तित्वात आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी प्रास्ताविक केले. साहित्यीक वि.दा.पिंगळे यांनी देखील यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. पुणे महानगर पालिकेच्या नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांनी भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमाला आयोजनामागची भूमिका विषद केली.



