नवाब मलिकांच्या मुलाची चौकशी होण्याची शक्यता

पुणे : ‘ईडी’कडून लवकरच नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. ईडीने आता आपला मोर्चा नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्याकडे वळवल्याची माहिती समोर येत आहे.
‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून मुंबईत मोठी छापेमारी करण्यात आली आहे. त्यासाठी दिल्लीहून ‘ईडी’च्या ४० अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत आले होते. या अधिकाऱ्यांनी तब्बल सात ठिकाणी एकाचेवळी छापे टाकले. यामध्ये फराज मलिक यांच्याशी संबंधित असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी कंपनीचा समावेश असल्याचे समजते. या कंपनीने युनियन बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जातील जवळपास १० कोटींची रक्कम फराज मलिक यांच्याशी संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोप आहे. असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजीकडून नफा मिळवण्यासाठी हे पैसे चुकीच्या पद्धतीने इतर कंपन्यांमध्ये वळवण्यात आले. यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाचे तब्बल १४९.८९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार बँक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.




