पुणे : इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

पुणे : येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ निर्माणाधीन इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागले. या मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही घटना दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्याचे ते म्हणाले. हे सर्व मजूर बिहार येथील कटियार या गावातील असल्याचे समोर आले आहे.



