वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात: अमृता फडणवीस यांचा दावा

मुंबई : वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबई.भाजपतर्फे आयोजित कॅन्सरमुक्त अभियानाचा अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना खड्ड्यांवरुन नाराजी जाहीर करत हा दावा केला.

“मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप असल्याची चर्चा सुरु असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही पुरोगामी संघटना आहेत. स्त्रियांचा आदर करणं ही संघाची प्राथमिकता आहे.”



